एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग -८

भाग-७ दुसर्‍या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.

आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक वगैरे देणे इथे अपेक्षित आहे. त्याच बरोबर पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिलीत तर अधिक चांगले.

मी आज खालील पुस्तके विकत घेतली.
१. मित्रहो - पु. ल. देशपांडे. परचुरे प्रकाशन. किंमत ३०० रू. पुलंच्या भाषणांचा संग्रह आहे. छान वाटते आहे.
२. कल्पनेच्या तीरावर - वि. वा. शिरवाडकर. काँटिनेंटल प्रकाशन. किंमत ५० रू.
३. क्रांतिसूर्य - विश्वास पाटील. मेहता पब्लिकेशन. किंमत १३० रू. क्रांतिसिंह नाना पाटलांवर आहे.
कोल्हापुरातील 'ग्रंथ'मधून १०% सवलतीत घेतली.

दिग्गज लेखकांची आगळीवेगळी पुस्तके घेतलीस तू छानच... :) माझ्या संग्रहात नेमाड्यांच्या पुस्तकांपैकी फक्त हिंदूच घ्यायचे राहिलेले आहे. ते घ्यायचा मोह मुद्दाम टाळतो आहे ;)

आषाढी एकादशी चा मुहूर्त साधून पुढील पुस्तके माझ्या संग्रहात आली. वारी एक आनंदयात्रा - संदेश भंडारे - येथे माहिती मिळेल असाही एक महाराष्ट्र - संदेश भंडारे या दुव्यावर माहिती मिळेल हसत खेळत ध्यानधारणा - ओशो आणि विज्ञानावर डार्विन आणि जीवसृष्टी रहस्य -संपादित (१२ लेखकांनी डार्विनच्या सिद्धांताचा घेतलेला वेध)-यात नंदा खरे पण आहेत सोनेरी टोळी - नाथमाधव (कादंबरी) आर्य चाणक्य - जनार्दन ओक (कादंबरी) क्षितिज - सुहास शिरवळकर (कादंबरी) झूम - सुहास शिरवळकर (कादंबरी)

In reply to by सागर

परत एकदा दमदार खरेदी झाली रे मित्रा तुझी. वारी एक आनंदयात्रा आणि असाही एक महाराष्ट्र बहुधा तुला सप्रेम भेट म्हणूनच मिळाली असतील :) ओशोंचे पुस्तक तुझ्या संग्रहात बघून थोडेसे आश्चर्यच वाटले. झूम तर सुशिंची सुवर्णमहोत्सवी कादंबरी आहे ना. दारूसारख्या एकदम वेगळ्याच विषयावरची चित्तवेधक कादंबरी.

In reply to by वल्ली

म्हणूनच मी संग्रहात आली असे लिहिले होते ;) ओशोंची माझ्याकडे ६ पुस्तके आहेत आणि त्यांच्या कित्येक प्रवचनांच्या एमपी थ्री पण आहेत. तुला आश्चर्य कशाचे वाटले ते जाणून घ्यायला आवडेल ;) सुशिंचे संग्रहात नसलेले पुस्तक मिळाले की मी लगेच उचलतो. यावेळी झूम आणि क्षितिज मिळाले... :)

In reply to by सागर

तुला आश्चर्य कशाचे वाटले ते जाणून घ्यायला आवडेल
तुझ्याकडे विज्ञानाची पुस्तके बरीच आहेत, खगोलाची पण. त्यात ओशोंसारखे एकदम धार्मिक पुस्तक शिवाय ते पण कादंबरी नसून प्रवचनात्मक असलेले बघून जरा चकित झालो.:)

In reply to by वल्ली

अरे अध्यात्मावरची पण माझ्याकडे भरपूर पुस्तके आहेत :) ध्यानधारणा, साधना, योग्यांची आत्मचरित्रे, प्रवचने, अशा अनेक स्वरुपांत आहेत साद देती हिमशिखरे तू वाचले असशील असे वाटते आहे. पण नसेन तर अवश्य वाच कादंबरी आहे पण मी वाचलेल्या आध्यात्मिक पुस्तकांपैकी अगदी सोप्या शब्दांत अध्यात्म त्यात विशद करुन सांगितले आहे.

In reply to by सागर

साद देती हिमशिखरे मला हिमालयावर आधारीत मोहिमांपैकी वाटायचे. अध्यात्मिक पुस्तक आहे हे बघून चक्रावूनच गेलो. :) कदाचित घेउनही टाकेन मग आता.