ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...९२

पुस्तकाचे नाव

---------------------------------------------------------------------------------------
दरवाजांत पोचलों. तो दगडांनी चिणून बंद केलेला. केवळ कमानीच्या माथ्यापाशीं काय ती हात दोन हात फट. तिच्यातून पुढं सरलों, अन् धोंड्यावर अलगद पाय देत खालतीं लवणांत उतरलों. ढळतं द्रोणाकार लवण. अति सुबक जागा होती. मागं वळून पाहिलं. तर दरवाजाच्या दुतर्फा बांधलेला तट. लवणांतून खालीं डोकावतां जवळ जवळ आठशें फूटी कडा. कड्याच्या टोकाशी पालथं झोपून बघितलं तळांत चरत असलेलीं गुरं खेळातल्या मातीच्या चित्रांवाणी दिसत होतीं.

कडा उभा होता. डावीकडे सताठ खोंबाळं. माकडांचं एक टोळकं कड्यावर उड्या घालीत वर चढूं लागलं. खोंबाळांना धरून. माकडंच तीं. लपकत वर चढलीं. मजकडे लक्ष जातांच किचकिचलीं. अन् डावीकडे झेंपावत वरच्या झाडदाटव्यांत दिसेनाशीं झालीं.
अति अवघड! या वाटेनं जीं धनगरं वर चढलीं, त्यांच्या पाठीच्या मणक्यांच्या तळीं इवलीं इवलीं शेपटं असली पाहिजेत.

---------------------------------------------------------------------------------------

संकेत १: हे प्रवासवर्णन नसून कादंबरीच आहे. एका थोर लेखकाने लिहीलेली. शैलीवरून लेखक ओळखणे फारसे अवघड जाउ नये.
संकेत २: एका प्रसिद्ध किल्ल्याच्या दरवाज्याच्या अवघड वाटेचे वर्णन यात आले आहे.
संकेत ३: रायगडावर आधारीत पार्श्वभूमीवरील ही कादंबरी असून वेच्यातील वर्णन हे तिथल्या वाघदरवाजाच्या अवघड वाटेचे आहे.
संकेत ४: रायगडावरच्या रावजी अवकीरकर धनगराची लेक मनी लग्न होउन मुंबईला सासरी जाते, निसर्गात वाढलेल्या या मुलीची शहरातल्या बकालतेत झालेली कुचंबणा व तिला परत रायगडाची, तिथल्या निसर्गाची लागलेली अनिवार ओढ याचे वेधक चित्रण या कादंबरीत आले आहे.

सागरचे अभिनंदन वेच्याचा पहिला विजेता. पुस्तक व लेखक अचूक ओळखले.
देवेंद्र प्रभुणे हे वेच्याचे दुसरे विजेते ठरले आहेत दोघांचेही अभिनंदन.
४ था ठळक संकेत आता दिला आहे. यातील मनी हे कथानायिकेचे नाव.

वेच्याचे उत्तर
पुस्तक: रानभुली
लेखकः गो. नी दांडेकर
पान क्र. १९

गरज वाटते आहे रे मित्रा संकेताची वेच्यावरुन हे एखादे भटकंतीचे पुस्तक असावे असा तर्क करता येतो. पण तुझी स्टाईल पहाता हा एखादा चकवा असू शकेन संकेत दे रे मित्रा

In reply to by सागर

शैलीवरुन लेखक ओळखता येणे सोपे आहे. अशा प्रकारच्या कादंबर्‍या अगदी मोजकेच लेखक लिहितात :)

In reply to by सागर

हा लेखक निसर्गात रमणारा, त्यातही किल्ल्यांमध्ये रममाण होणारा. अशा प्रकारच्या अनेक कादंबर्‍या या थोर लेखकाने लिहीलेल्या असून त्यातल्या आवृत्ती संपल्याने अतिशय दुर्मिळ झालेल्या २ कादंबर्‍या माझ्याकडे असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. :) असो. जादाचा संकेत वर दिला आहे.

In reply to by वल्ली

मित्रा, आधीच मी म्हटले नव्हते का की हा वेचा चकवा आहे.. :) तस्सेच झाले आता. भुलवणार्‍या वेच्याचे रहस्य उत्तर जाहीर झाल्यावर ;)

In reply to by सागर

वेचा भुलवणारा आहे खरा पण इतकाही अवघड नाही. एकदा लेखकाचे नाव लक्षात आल्यावर (आणि ते वेच्यातील शैलीनुसार ओळखणे तसे सोपे आहे) पुस्तक ओळखणे विशेषतः ती कादंबरी असल्याने फारसे अवघड जाउ नये.