ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...९०

संकेत 1: अनुवादित कादंबरी आहे.
---
गाडी दळवाई स्टेशनपाशी येईपर्यंत पावसाचा जोर वाढला होता. श्रोत्रींनी खिडकीतून बाहेर पाहिलं. दोन्ही बाजूला उंच वाढलेल्या वृक्षांमधून कपिला वाहात होती. त्यांना आठवत होतं तेव्हापासून त्यांनी दररोज याच कपिलेत अंघोळ केली होती. कितीतरी वेळा मन अस्थिर झालं की या नदीकाठी बसून त्यांनी ते शांत केलं होतं. याच नदीनं त्यांच्या एकूलत्या एका मुलाची आहुती घेतली होती आणि याच नदीच्या पाण्यावर वाढलेलं धान्य इतकी वर्षं खाऊन त्यांचा देह पोसला होता. श्रोत्रींच्या डोळ्यांसमोरून कितीतरी दृश्यं पुढं जात होती. आई आणि नंजुंड श्रोत्रींची आठवण येऊन गेली, न पाहिलेल्या शामदासांची आठवण झाली. पत्नी भागीरथी, लक्ष्मी, मुलगा नंजुंड, चिनी, ललिता, कात्यायनी...
कात्यायनीची आठवण येताच त्यांचं मन तिथंच थबकलं, चौदा वर्षं झाली होती तिला पाहून! आता ती कुठं असेल? ती बेंगळूरला असल्याचं माग सदाशिवरावांनी सांगितलं होतं. लौकीक-जीवनाचा त्याग करण्याआधी तिला एकवार भेटावं असं त्यांच्या मनात आलं. मैसूरली जाऊन आधी सदाशिवरावांना भेटायचं आणि त्यांच्याकडून कात्यायनीचा पत्ता घेऊन बेंगळूरला तिला भेटून नंतर हरिद्वारला मार्ग धरायचा असं ठरवत असतानाच चामराजपूर स्टेशन आलं. काठीला गाठोडं अडकवून ते गाडीतून उतरले.
पावसाची संततधार कोसळत होती.

व्यनि आले त्या क्रमाने -
१. आनंदयात्री - लेखकाचा अंदाज बरोबर. पुढच्या अंदाजासाठी संधी.(इथं थोडी गंमत केली. आनंदयात्री यांनीही पुस्तकाचे नाव बरोबर सांगितले, पण पुस्तक बहुदा.. अशा भाषेत. म्हणून त्यांना पुढच्या अंदाजासाठी संधी असं म्हटलं होतं.)
२. देवेन्द्र प्रभुणे - लेखकाचा अंदाज बरोबर. पुढच्या अंदाजासाठी संधी.(इथंही तसेच. पण देवेन्द्र यांनी दोन पुस्तकांची नावं दिली. त्यात एक बरोबर, एक चूक.)
३. वल्ली - लेखक बरोबर, कादंबरीचे नावही बरोबर. अभिनंदन.
४. चित्रा - लेखकाचा अंदाज बरोबर. पुढच्या अंदाजासाठी संधी.
५. सागर - लेखकाचे नाव बरोबर, कादंबरीचे नावही बरोबर. अनुवादकाचेही नाव बरोबर. अभिनंदन.
तर एकूणात आनंदयात्रीचा अंदाज बरोबर, वल्ली आणि सागर यांनी नेमके उत्तर दिले. देवेन्द्र यांचा एक अंदाज बरोबर. चित्रालने लेखक बरोबर ओळखला.
कादंबरीचे नाव - वंशवृक्ष. लेखक एस. एल. भैरप्पा. अनुवाद - उमा कुलकर्णी.

In reply to by श्रावण मोडक

वंशवृक्ष ही बहुधा भैरप्पांची सर्वश्रेष्ठ कादंबरी, अजून वाचलेली नाही, संग्रहीपण नाही. पण पुस्तक प्रदर्शनात अनेकवार चाळली गेलेली आहे तसेच कादंबरीवरच्या, भैरप्पांवरच्या चर्चांतूनही तिच्यातल्या पात्रांविषयी थोडीफार माहिती होती. विशेषतः नंजुंड श्रोत्रीं हे नाव तर बरेच वेळा ऐकले गेले होते त्यामुळे वेचा वाचतावाचताच उत्तर आपोआपच उमटले गेले. भैरप्पांच्या जा ओलांडूनी, आवरण, पर्व वाचल्या आहेतच. 'पर्व'ने तर निव्वळ भ्रमनिरास केला. आवरण, जा ओलांडूनी उत्तमच. 'सार्थ' संग्रही आहे. असो. आता वंशवृक्ष आता लवकरच संग्रही येईलच.

In reply to by वल्ली

आता वंशवृक्ष आता लवकरच संग्रही येईलच. मी २ वर्षांपूर्वी घेतले होते. पण कोणीतरी वाचायला नेले आणि परत दिलेच नाही. :( त्यामुळे ही नवी खरेदी होणारच. श्रामो तुला धन्यवाद या सुंदर पुस्तकातील एक सुंदर वेचा दिलास त्याबद्दल :)

In reply to by वल्ली

नंजुंड श्रोत्री या कादंबरीत दोन आहेत. एक थोरले आणि दुसरे त्यांचे नातू. हे दोघंही कादंबरीत पार्श्वभूमीवरच आहेत. तुला म्हणायचे आहेत ते बहुदा श्रीनिवास श्रोत्री, जे मधले. थोरल्यांचे चिरंजीव आणि धाकल्यांचे पिता. या कादंबरीचे एका अर्थाने नायक. वंशाचा अभिमान असणारे आणि शेवटी स्वतःचीच जन्मकहाणी समजल्यानंतर आणि त्याचे इतर पदर कळल्यानंतर एरवी जिथं कोणीही कोलमडून पडला असता, तिथं कोलमडून न पडता त्यालाही सामोरे जाणारे, आपल्या जीवननिष्ठांमधील काही मूल्यांबाबत प्रामाणिकच रहात, पण जाताना माझ्यासारख्याच्या मनात या वंश नामक कल्पनेबाबतच असंख्य प्रश्न, जे कादंबरीत आलेले दिसत नाहीत किंवा जे श्रीनिवास श्रोत्रींच्या मार्फत उपस्थित होऊ शकत असूनही दिसत नाहीत, असे प्रश्न, उपस्थित करणारे.

In reply to by श्रावण मोडक

तुला म्हणायचे आहेत ते बहुदा श्रीनिवास श्रोत्री
नाही नंजुंड श्रोत्री हेच म्हणायचे होते. कारण नाव एकतर थोडेसे वेगळे असल्यामुळे चाळताचाळता हेच नाव प्रामुख्याने ध्यानी राहत होते. बाकी श्रोत्री हे नाव तर बरेचवेळा वाचले गेले होते पण श्रीनिवास हे नाव लक्षात नव्हते. आता हे पुस्तक मात्र घ्यायलाच हवे हे खरे.