ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८९

पुस्तकाचे नाव

ही कादंबरी वाचली असल्यास कोणत्याही संकेताची गरज पडणार नाही अगदी गरज पडलीच तर वेच्यातच ठळक संकेत आहेत. :) या वेच्याचे विक्रमी वेळेतील पहिले विजेते आहेत वल्ली. अभिनंदन मित्रा :) अपेक्षेप्रमाणे दुसरे विजेते आहेत देवेन्द्र प्रभुणे. अभिनंदन :) श्रावण मोडक यांनी लेखक अचूक ओळखला आहे. या लेखकाची पुस्तके वाचली नसल्यामुळे त्यांनी पास सांगितले तरी पण लेखक ओळखल्यामुळे तेही अर्धे विजेते आहेतच :) आनंदयात्रीने देखील लेखक ओळखला आहे. अजून १ संकेत: मी, वल्ली आणि देवेन्द्र या लेखकाचे प्रचंड मोठे पंखे आहोत :) (हा ही एक संकेतच समजा ) अर्थात पुस्तकविश्व वर अजून कितीतरी सदस्य या लेखकाचे पंखे आहेत. वेचा ज्यातील आहे ती एक प्रसिद्ध विनोदी कादंबरी आहे उत्तर जाहीर करतो आहे कादंबरीचे नाव : जाता-येता लेखक : सुहास शिरवळकर वेच्याचे पुस्तकातील स्थान : पान क्रमांक १४४ वेचा: ----------------------------------------- "बघ ना राव ! दोघींनी ह्यांना पार 'भाऊ' महाराज करुन टाकलं!" "छे! मीच विनीला म्हणालो बांध राखी!" "रव्या, विनीला का इराला?" "विनीला अर्थातच. इराचं आधीच लग्न ठरलं आहे.!" "अँ! काहीतरी घोळ आहे!" "का? तुला इरानं राखी बांधली का?" "होय!" "हे बघ तुझ्या माहितीत वेडी कोण?" "इरा!" "आयला! तिची आई वेडी... आजोबांनी वेडाच्या भरात आत्महत्या केली... मामा" "करेक्ट. हे सगळं इराच्या बाबतीत!" "माझ्या वेळी पार्ट बदलण्यात आले गोट्या ! विनी वेड्या घराण्याची, आणि इरा एंगेजड् !" "म्हणजे..." "सॉलिड गोची आहे भडव्यांनो! त्या दोघींपैकी कोणी वेडं नाही, का एंगेजड् नाही!" "मग?" "तुम्ही फार हात धुऊन त्यांच्या मागे लागलात, म्हणून त्यांनी तुम्हाला उल्लू बनवलं!" "बावळट साले? पोरी गटवतायत् पोरी!" -----------------------------------------

एकदम खुसखुशित वेचा निवडलास रे. माझे उत्तर जर बरोबर असेल तर ही कादंबरी या वेच्याहूनही जास्त खुसखुशित आहे.

In reply to by वल्ली

वल्ली मित्रा, या कोड्याचे उत्तर तू वेच्याची सुरुवात वाचता वाचता लगेचच ओळखशील याची खात्री होती. :) देवेन्द्र पण सहज ओळखेल असे वाटते आहे. बाकीच्या सदस्यांच्या उत्तराची ही वाट बघतो आहे :)

In reply to by चित्रा राजेन्द…

चित्रा, हा हरहुन्नरी लेखक तसा थोडा उपेक्षितच राहिलेला आहे. ज्याने या लेखकाचे एक पुस्तक वाचले त्याने या लेखकाची मिळतील ती सगळी पुस्तके वाचली असे जवळपास ९०% वाचक सापडतील. :) ही विनोदी कादंबरी जमल्यास नक्की वाच

या लेखकाचे जे पंखे आहेत त्यांनी तर ही कादंबरी तर वाचलेलीच असणार, एकदा नव्हे तर अनेक वेळा. शिवाय हा एकमात्र असा लेखक की ज्याच्या पुस्तकांवर पुस्तकविश्ववर प्रचंड चर्चा झालेली आहे. प्रतिसादांची संख्या दुसर्‍या पानावर गेल्यामुळेही चर्चेसाठी परत नवा धागा काढावा लागला आहे.

In reply to by वल्ली

केवढा मोठा संकेत दिलास मित्रा :) आता येथील पुविकर किमान लेखक सहजच ओळखतील अजून १ विजेता मिळाल्यावर उत्तर जाहीर करेन :)

एक तूफान विनोदी कादंबरी निवडलीस तू यावेळी सागर आणि आम्हाला एकदम नॉस्टॅल्जिक केलंस. जाता येता चार पाच वेळा तरी वाचून झालीय आतापर्यंत आणि दरवेळी परत वाचताना परत तेव्हढाच आनंद मिळतो. लोणावळा-खंडाळ्याला फिरायला गेलेल्या मित्रांची आणि त्यांना तिथे भेटलेल्या पोरींची, तिथल्या गमतीजमतींची ही गमतीदार कथा. कादंबरीत काहीवेळा पांचट विनोद येतात, पण ते कादंबरीतल्या पात्रांच्या मनुष्यस्वभाला अनुसरूनच. हे अर्थात लेखकाच्या मनुष्यस्वभावाच्या सू़क्ष्म निरीक्षणातून आलेलेच यश.

In reply to by वल्ली

वल्ली मित्रा, अगदी खरे आहे. मी जेव्हा कधी लोणावळा खंडाळ्याला जायचो तेव्हा मला या बहाद्दरांनी मोटरसायकल वर केलेला मस्त प्रवास व या ट्रिपमधील गमती जमती आपसूकच आठवतात :) सुहास शिरवळकरांनी कादंबर्‍यांतून निर्मिलेला विनोद हा कथानकातील वास्तवाला धरुन असणार्‍या घटनांमुळे अगदी जिवंत वाटतो. जाता-येता मधील सगळी पात्रे पण भन्नाट आणि त्यांच्यावरच्या केल्या गेलेल्या कोट्या देखील भारी. जसे गोट्याच्या बॉबी (गाडीला) बुटकं म्हणणं रवि ओक ला टाईट फिटींग चे आकर्षण लंब्या बुल्गानीन अशी नुसती धमाल मस्ती आहे या कादंबरीत. कादंबरी वाचतानाच वाचकाला कळते की लोणावळा खंडाळ्याची ट्रिप कशी केली पाहिजे . :) ही कादंबरी निखळ मनोरंजन देते यात शंकाच नाही नक्की वाचावी अशीच आहे...

In reply to by सागर

जऽऽरा कामात अडकलो गेले काही दिवस तर सागरनं असा झटका करुन टाकला होय? :) च्यायला..काय झक्कास कादंबरी होती रे ही. चौघंच्या चौघं मित्र नग अगदी. एक असं येडं, तर दुसरं तसं येडं अशी गत. आणि "खिशातून वळवळत गांडुळ पडावं तसा पडलेला काळा दोरा.." वगैरे वाचून तर अक्षरशः फुटलो होतो. :) अरे, आहे का कोणाकडे 'जाता-येता'ची प्रत? बाजारात मिळत नाहीए. आहे का रे कोणी दानशूर? ;)

In reply to by कैवल्य

काय रे हे धम्या, अरे सागरने वेचा दिलाय म्हणजे त्याच्याकडे तर आहेच रे ही प्रत. शिवाय तो दानशूरपण आहे. तो देईल ही तुला ही प्रत. अर्थात नंतर तीच प्रत तू मला देशील हे सांगणे न लगे. ;)

In reply to by वल्ली

धम्या तुझा पत्ता विरोपाने पाठव तुला झेरॉक्स प्रत पाठवतो :) चौघे सगळे नग होते नग .... अशी ट्रीप एन्जॉय करणारे भाग्यवान.... ;)